Ad will apear here
Next
रामदास पाध्ये, हंसा वाडकर, सुभाष घई, जे. ओमप्रकाश


बोलक्या बाहुल्यांचे खेळ प्रसिद्ध करणारे शब्दभ्रमकार रामदास पाध्ये, मराठी अभिनेत्री-नृत्यांगना रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर, राज कपूरनंतर ‘शोमॅन’ या पदावर आरूढ झालेले एकमेव निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई, प्रख्यात दिग्दर्शक, निर्माते जे. ओमप्रकाश यांचा २४ जानेवारी हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
.......
रामदास पाध्ये
२४ जानेवारी १९४५ रोजी रामदास पाध्ये यांचा जन्म झाला. रामदास पाध्ये यांचा अर्धवटराव माहीत नाही असा एकही मराठी माणूस शोधून सापडणार नाही. बोलक्या बाहुल्यांचे खेळ प्रसिद्ध करण्याचं श्रेय रामदास पाध्ये व त्यांच्या पत्नी अपर्णा पाध्ये यांनाच जाते. आजच्या कार्टून्स, अॅनिमेशनच्या काळातही बोलक्या बाहुल्यांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. 

रामदास पाध्ये हे स्वत: मेकॅनिकल इंजिनीअर आहेत. रामदास पाध्ये यांचे वडील यशवंत पाध्ये, म्हणजेच प्रो. वाय. के. पाध्ये यांनी शब्दभ्रमाची कला पहिल्यांदा भारतात आणली. साधारणतः १९२०च्या सुमारास प्रोफेसर पाध्ये जादूचे प्रयोग करायचे. त्या दरम्यान त्यांनी दोन मुखवटे घेऊन शब्दभ्रमाचे कार्यक्रम करायलाही सुरुवात केली. त्या पात्रांची नावे होती बंडी शास्त्री आणि चक्रम काका. पहिल्या महायुद्धाच्या काळात त्यांनी काही परदेशी कलाकारांचे श‌ब्दभ्रमाचे कार्यक्रम पाहिले. त्यातून प्रेरणा घेऊन, आपणही एक पूर्ण बाहुली तयार करावी असे त्यांच्या मनाने घेतले. त्यावेळी इंग्रजीतील एक कार्यक्रम पाहून त्यांनी एक पात्र तयार केले, ज्याचे नाव होते ‘मिस्टर क्रेझी’. या इंग्रजी नावावरूनच पुढे मराठीत त्याचे नामकरण झाले ‘अर्धवटराव’. या बाहुल्याचे स्केच त्यांनी तयार केले. तेव्हा भारतामध्ये बाहुल्या तयार होत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी इंग्लंडमधील एका दुकानामधून ही बाहुली मागविली होती. १९१६-१७च्या सुमारास ही बाहुली तयार झाली आणि पाध्ये यांच्याकडे आली. हाच आपल्या सर्वांचा लाडका अर्धवटराव. प्रो. पाध्ये यांनी या बाहुलीसंदर्भातील सगळी माहिती लिखित स्वरूपात ठेवली होती; पण पुढे त्या हस्तलिखितांना वाळवी लागल्याने ती मिळू शकली नाही. त्यामुळे साधारणतः १९१६-१७ पासून अर्धवटरावाचे कार्यक्रम सुरू झाल्याची माहिती रामदास पाध्ये देतात.

अर्धवटरावला घेऊन प्रो. पाध्ये कार्यक्रम करू लागले. पुढे त्यांच्या जोडीला कुणीतरी असावे म्हणून पत्नी आवडाबाई आली. अर्धवटराव-आवडाबाई यांना घेऊन केलेल्या विनोदी कार्यक्रमांना खूप चांगला प्रतिसाद मिळू लागला. या दोन बाहुल्यांच्या जोडीला मग त्यांची मुले, शामू आणि गंपू हे दोघेही आले. या चौघांना घेऊन काही सामाजिक समस्यांवर भाष्य करणारे काही कार्यक्रम करू, या विचारातून त्यांनी कुटुंबनियोजनाचा संदेश देणारे कार्यक्रमही केले. मुंबईमध्ये गणेशोत्सव, नवरात्रौत्सवात हे कार्यक्रम व्हायचे. प्रो. पाध्ये मराठीबरोबरच इंग्रजीतही कार्यक्रम करायचे. अर्धवटरावांशी गप्पा मारताना ते त्या-त्या स्थळ, काळानुरूप पंचलाइन्स शोधून काढायचे. प्रो. पाध्ये अर्धवटरावला घेऊन आरशासमोर उभे राहून बोलण्याचा सराव करायचे. तेव्हा त्यांचा मुलगा लहानगा रामदास ते कुतुहलाने पाहत असायचा. एकदा असाच सराव करत असताना प्रो. पाध्ये थोडा वेळ आतल्या खोलीत गेले होते. तेव्हा लहान असलेल्या रामदास यांनी अर्धवटरावांशी बोलण्यास सुरुवात केली. अर्थात, अर्धवटराव काही त्यांच्याशी बोलेना. रामदास वडिलांना म्हणाले, ‘हा अर्धवटराव फक्त तुमच्याशी बोलतो. माझ्याशी नाही.’ त्यांचे बोलणे ऐकून ते हसले. 

ते म्हणाले, ‘मी सांगतो तसे केलेस तर तो तुझ्याशीही बोलू लागेल.’ अर्धवटराव आपल्याशी बोलावा या कुतुहलापोटी रामदास यांनी शब्दभ्रम कलेचे धडे गिरविण्यास सुरुवात केली. पुढे ११ वर्षे अभ्यास करून त्यांनी ही कला आत्मसात केली. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे रामदास यांनी स्वतः एक पात्र निर्माण केले ज्याचे नाव होते ‘बेटा गुलाब’.

रामदास साधारणतः सतरा-अठरा वर्षांचे असताना त्यांनी एक मे १९६७ रोजी मुंबईच्या बिर्ला क्रीडा केंद्रात त्यांचा पहिला कार्यक्रम केला. हा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेची आठवण ते सांगतात. ते म्हणाले होते, ‘आता माझी चिंता मिटली. माझा अर्धवटराव कायम बोलत राहणार असा विश्वास मला वाटतोय.’ वडिलांकडून मिळालेली ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया रामदास यांच्यासाठी मोलाची होती. त्यानंतर दुर्दैवाने आठच दिवसांनी वाय. के. पाध्ये यांचे‌ निधन झाले. पुढे रामदास यांनी अर्धवटरावसह कार्यक्रम करायला सुरुवात केली. त्यांनी बनविलेले व जिवंत केलेले अनेक बाहुले जगभरच्या रसिकांनी आपलेसे केले आहेत. काही काळ त्यांनी नोकरीही केली. त्या काळी पंचतारांकित हॉटेलांमध्ये जादूगार, काही कलाकार यांचे खेळ होत असत. तेव्हा एका हॉटेलने रामदास यांना बोलक्या बाहुल्यांचा खेळ करण्याचे निमंत्रण दिले. पंचतारांकित हॉटेल असल्याने हा कार्यक्रम इंग्रजीत करावा लागायचा. तेव्हा अर्धवटरावाचा ‘मिस्टर क्रेझी’ होत असे. या कार्यक्रमांमुळे माझी इंग्रजीवरील हुकूमत वाढली असे रामदास सांगतात.

एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये अर्धवटरावांचा हा खेळ एका परदेशी व्यक्तीने पाहिला आणि त्यांना तो खूप आवडला. पुढे त्याने अर्धवटरावांना अमेरिकेत येण्याचे निमंत्रण दिले. कोलंबिया ब्रॉडकास्टसाठी हा कार्यक्रम होणार होता. तेव्हा रामदास यांच्या भावाने एक नवेकोरे स्क्रिप्ट लिहिले. त्या कार्यक्रमाचे नाव होते ‘योग आणि ड्रग्ज’. रामदास आणि त्यांचे भाऊ त्यासाठी अमेरिकेला गेले. त्या निमित्ताने अर्धवटरावांनी भगवी कफनी, हातात कमंडलू, रुद्राक्षांची माळ अशी वेशभूषा केली होती. तिथल्या मंडळींना हा कार्यक्रम खूप आवडला. अर्धवटरावने अडीच महिने अमेरिकेला राहून विविध कार्यक्रमांतून तेथील प्रेक्षकांवर आपली जोरदार छाप पाडली.

अमेरिकेहून मुंबईला आल्यानंतर रामदास पाध्ये यांनी नोकरी सोडली आणि पुढे पूर्णवेळ या कलेतच स्वतःला झोकून दिले. १९७२-७३चा तो काळ होता. दूरदर्शनची सुरुवात झाली आणि अर्धवटराव टीव्हीवर झळकला. दूरदर्शनवर हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत अर्धवटराव प्रेक्षकांशी गप्पा मारू लागला. ‘मेरी भी सुनो’ हा अर्धवटरावचा पहिला कार्यक्रम. नंतर त्याच्यासोबत इतर पात्रेही आली. मराठीत ‘तुम्हीच विचार करा’ आणि त्याचेच हिंदी रूपांतर ‘आपही सोचिए’ दूरदर्शनवर दिसू लागले. टीव्हीमुळे अर्धवटराव घरोघरी पोहोचला. अगदी साध्या-साध्या विषयांवरून प्रेक्षकांशी मारलेल्या गप्पा हे अर्धवटरावाचे वैशिष्ट्य होते. अनेक जाहिरातींमध्येही अर्धवटराव चमकला.

रामदास पाध्ये यांचा अर्धवटराव मोठ्या पडद्यावरही चमकला आहे. १९६० च्या सुमारास आलेल्या ‘अकेली मत जैयो’ या चित्रपटात तो ज्युबिलीकुमार राजेंद्रकुमारसोबत गप्पा मारताना पडद्यावर दिसला. त्यावेळी प्रो. वाय. के. पाध्ये यांनीच अर्धवटरावला आवाज दिला होता. एका फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये साक्षात अमिताभ बच्चन यांना अर्धवटरावचा कार्यक्रम खूप आवडला. अमिताभ यांना त्यांच्या ‘महान’ सिनेमात शब्दभ्रमकाराची भूमिका साकारायची होती. त्यांनी ही कला शिकण्याची इच्छाही प्रदर्शित केली. परंतु कमी वेळेत ते शक्य नसल्याने रामदास पाध्ये यांनीच पडद्याआडून अर्धवटरावाला बोलते करायचे ठरले. त्यावेळी अर्धवटराव अमिताभसोबत चमकला. बिग बींबरोबर झळकल्याने अर्धवटरावची लोकप्रियता वाढली. मराठीत ‘झपाटलेला’ या चित्रपटामध्ये सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी अर्धवटरावची जोडी जमली होती.

अर्धवटराव परेदशातही सुपरहिट ठरला. सिंगापूर, बँकॉक, दुबई, ओमान, हाँगकाँग अशा विविध देशांतील चॅनेल्सनी अर्धवटरावला घेऊन कार्यक्रम केले. सुमारे २५ देशांतील टीव्हीवर अर्धवटराव झळकला आहे. या कार्यक्रमांबरोबरच त्या देशांमध्ये खासगी कार्यक्रमही खूप झाले. मर्लिन मन्रो या जगप्रसिद्ध हॉलिवुड अभिनेत्रीच्या स्मृतिनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात तिला मानवंदना देण्यासाठी ज्या विविध कलाक्षेत्रातील रथी- महारथींचा समावेश करण्यात आला होता, त्यात पाध्येंच्या खास बाहुल्यांच्या कार्यक्रमानेसुद्धा उपस्थितांमध्ये आपली चांगलीच छाप पाडली होती.

मराठी भाषेतील आद्य नाटककार विष्णुदास भाव्यांनी अगदी बारीकसारीक हालचाल करू शकतील अशा असंख्य कळीच्या लाकडी बाहुल्या बनवून ठेवल्या होत्या. रंगमंचावर सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग त्या बाहुल्या वापरून करावयाचा त्यांचा इरादा होता. विष्णुदास भाव्यांनी बनवलेल्या त्या बाहुल्या पुढे रामदास पाध्येंच्या हातात आल्या. रामदास पाध्ये व अपर्णा पाध्ये यांनी खूप दिवस खटपट करून विष्णुदास भावे यांच्या बाहुल्यांच्या रहस्याचा छडा लावला, आणि एके दिवशी, विष्णुदास भावे यांना रंगमंचावर करता न आलेला सीता स्वयंवराचा प्रयोग त्याच बाहुल्या वापरून केला. त्यांनी तयार केलेले विविध बाहुले जगाच्या कानाकोपऱ्यातून नावाजले गेलेले आहेत.
.....


हंसा वाडकर
२४ जानेवारी १९२४ रोजी हंसा वाडकर यांचा जन्म झाला. चित्रपटसृष्टीतील पहिली ग्लॅमरस नायिका म्हणजे हंसा वाडकर. सौंदर्य, नृत्य आणि अभिनय या तिन्ही आघाड्यांवर परिपूर्ण असणाऱ्या या नायिकेनं दोन दशकं गाजविली. हंसाबाईंनी आपल्या कारकिर्दीत मोजकेच चित्रपट केले. परंतु, त्यातील त्यांच्या भूमिका आणि पडद्याबाहेरच्या बेफाम वागण्यानं त्या प्रेक्षकांच्या सदैव लक्षात राहिल्या. हंसाबाईंचं आयुष्य एवढं जबरदस्त होतं की श्यायम बेनेगलांसारख्या विख्यात दिग्दर्शकाला त्यांच्यावर ‘भूमिका’सारखा चित्रपट बनविण्याची इच्छा झाली.

हंसाबाईंचा जन्म मुंबईतल्या एका सुखवस्तू कुटुंबात झाला. त्यांचं मूळ नाव रतन साळगावकर. नृत्य-संगीताची त्यांच्या घरी परंपराच होती. रतनच्या आजी बयाबाई साळगावकर या चांगल्या गायिका होत्या. रतनचं पितृछत्र तिच्या लहानपणीच हरवलं. तेव्हा रतनला तिच्या आई आणि आजीनं वाढवलं. रतनला संगीत आणि नृत्याचे धडे देण्यासाठी तिच्या आईनं त्या काळातले मोठमोठे उस्ताद आणि गवई यांना पाचारण केलं होतं. परंतु रतनचा सूर त्यांच्याशी काही जुळला नाही. उस्ताद घरी आले की रतन एकतर घरातून पळ काढे किंवा कुठं तरी लपून बसे. तेव्हा बयाबाईंनीच आपल्या नातीच्या जडणघडणीची जबाबदारी स्वतःवर घेतली. त्या स्वतः रतनला शिकवायला लागल्या. गाण्यातली एक ओळ किती वेगवेगळे भाव दाखवून गाता येते, याचं प्रशिक्षण त्यांनी रतनला दिलं. रतन आपल्या आजीला ‘जीजी’ या नावानं हाक मारीत असे. मराठी-हिंदीबरोबरच इंग्रजी भाषेवरही त्यांनी प्रभुत्व मिळवलं. 

काही काळातच रतन तयार झाली आणि वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी तिला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. मामा वरेरकर या चित्रपटाचे लेखक होते. या चित्रपटासाठी रतन साळगावकरचं ‘हंसा वाडकर’ असं नामकरण झालं. त्या काळात चित्रपटसृष्टीबाबत कोणी फारसं चांगलं बोलत नसे. त्यामुळे या क्षेत्रातील आपल्या प्रवेशाचे चटके आपल्या कुटुंबीयांना बसू नयेत, या विचारानं रतननं आपलं नाव आणि आडनाव दोन्हीही बदललं. अर्थात हे नाव पुढं आयुष्यभरासाठी त्यांच्याशी जोडलं गेलं. तो काळ असा होता, की मुलींची लग्न १५व्या- १६व्या वर्षी होत. चित्रपटसृष्टीत कारकीर्द घडविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या हंसाबाईंना समाजाच्या या रुढीपुढं नमावं लागलं. वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि इथून त्यांच्या वादळी आयुष्याची सुरुवात झाली. 

हंसाबाईंना अभिनेत्री म्हणून पहिल्यांदा नाव मिळवून दिलं ते ‘प्रभात’च्या ‘संत सखू’ चित्रपटानं. या चित्रपटामधील संत सखूची अतिशय सोज्वळ भूमिका हंसाबाईनं मोठ्या ताकदीनं साकारली होती. या भूमिकेच्या अगदी विपरीत भूमिका त्यांनी व्ही. शांताराम आणि बाबूराव पेंटर यांचं संयुक्त दिग्दर्शन असलेल्या ‘लोकशाहीर राम जोशी’ या चित्रपटामध्ये साकारली. या चित्रपटात त्यांनी बया या तमासगिरीणीची व्यक्तिरेखा वठवली होती. ‘...सुंदरा मनामंदी भरली... हवेलीत शिरली... जरा नाही ठरली... मोत्याचा भांग....’ या राम जोशींच्या काव्यानं आणि हंसाबाईंच्या ठसक्यानं बहार आणली. या दोन्ही भूमिकांमध्ये जमीन-अस्मानाचं अंतर होतं. परंतु आपल्या अदाकारीनं हंसाबाईनं हे अंतर पुसून टाकलं. गोरा वर्ण, सतेज कांती, हसरे, टपोरे डोळे, सडसडीत बांधा आणि या जोडीला अभिनयाची लाभलेली देणगी... सात दशकांपूर्वीच्या त्या मराठी चित्रपटसृष्टीतल्या अप्सरा होत्या.

‘राम जोशी’ चित्रपट सुपरहिट ठरला आणि हंसाबाईंना व्ही. शांताराम, गजानन जागीरदार, राजा परांजपे, राजा ठाकूर, भालजी पेंढारकर यांच्यासारख्या श्रेष्ठ दिग्दर्शकांकडे काम करण्याची संधी त्यांना मिळाली. या काळात त्यांनी ‘रामशास्त्री’, ‘धन्यवाद’, ‘पुढचं पाऊल’, ‘मी तुळस तुझ्या अंगणी’, ‘नायकिणीचा सज्जा’, ‘सांगत्ये ऐका’ यांसारखे मोजकेच चित्रपट केले. त्याला मुख्य कारण ठरलं ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामधील संकटं. पतीबरोबरील मतभेदांमुळे त्यांनी एका क्षणी घर सोडलं आणि पुढं त्यांचं सगळंच आयुष्यच भरकटत गेलं. याचा विपरीत परिणाम त्यांच्या कारकिर्दीवर झाला. 

चित्रपटसृष्टीतील ग्लॅमर जगतामध्ये वाहवत जाण्याची कारणमीमांसा त्यांनी ‘सांगत्ये ऐका’ या आपल्या आत्मचरित्रात केली आहे. ‘चित्रपटसृष्टी म्हणजे एक जाळं आहे. या जाळ्यात जो अडकला त्याची सुटका नाही,’ असा उल्लेख त्यांनी या पुस्तकात केला आहे. संकटं आली की ती एकट्यानं येत नाहीत, याचा अनुभव हंसाबाईंना आला. वैयक्तिक आयुष्यातील घसरण आणि कारकीर्द उतरणीला असतानाच त्यांना कर्करोगासारख्या दुर्धर आजारानं गाठलं. या आजाराने त्यांचं पूर्ण खच्चीकरण झालं. मुंबईतल्या ग्लॅमरस जगातून बाजूला होत त्या विश्रांतीसाठी बराच काळ महाबळेश्वारला जाऊन राहिल्या होत्या. एक काळ त्या प्रसिद्धीच्या शिखरावर होत्या. त्यांच्या आजूबाजूला चित्रपटसृष्टीतील नामवंतांची गर्दी होती. स्टुडिओबाहेर त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी असायची. परंतु ती गर्दी आता पांगली होती. एकटेपणा त्यांना अगदी असह्य झाला होता. आजारातून बरे होऊन पुन्हा कारकीर्द घडविण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. परंतु हा लावण्यसूर्य जो ढळला तो ढळलाच. तो पुन्हा तेजोमय झाला नाही. आपल्या आयुष्याची बेरीज-वजाबाकी ‘सांगत्ये ऐका’ या आत्मचरित्राद्वारे लिहून ठेवली. हे आत्मचरित्र ‘अभिनेत्री की आपबीती’ या शीर्षकानं हिंदी भाषेतही प्रसिद्ध झालं. हंसाबाईंच्या चरित्रावर बेतलेला ‘भूमिका’ चित्रपट श्याम बेनेगल यांनी निर्माण केला. या चित्रपटात हंसाबाईंची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या स्मिता पाटील यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

हंसा वाडकर यांचे निधन २३ ऑगस्ट १९७१ रोजी झाले. 
..........


सुभाष घई
२४ जानेवारी १९४५ रोजी नागपुरात सुभाष घई यांचा जन्म झाला. घई यांचा जन्म नागपूरचा, सुभाष घई यांनी हिरो’, ‘कर्ज’, ‘राम-लखन’, ‘खलनायक’ अशा चित्रपटांच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीवर दशकाभराहून जास्त काळ अधिराज्य गाजविले. हिंदी प्रेक्षकांची नाळ ओळखणारा निर्माता-दिग्दर्शक म्हणून सुभाष घईंची ओळख आहे. कालीचरण, कर्ज, मेरी जंग, हीरो, कर्मा, राम लखन, खलनायक, सौदागर, परदेस आणि ताल असे एकाहून एक मनोरंजक चित्रपट देणाऱ्या घई यांचे चित्रपट म्हणजे मनोरंजनाची शंभर टक्के खात्री, असे प्रेक्षकांना वाटते.

राज कपूर यांच्या नंतर ‘शोमॅन’ या पदावर आरूढ झालेले एकमेव सुभाष घई. सुभाष घई यांना अभिनेता बनायचे होते. ऐंशीच्या दशकात दिलीपकुमारला विधाता, कर्मा आणि सौदागर या चित्रपटातून संधी देणारे ते पहिले दिग्दर्शक होते. आपल्याच चित्रपटातून चेहरा दाखवण्याची हौसदेखील त्यांनी पूर्ण केली. मुक्ता आर्टस् या नावाने सुभाष घई यांची चित्रपट संस्था आहे. २००८मध्ये ही चित्रपटसंस्था वळू या मराठी चित्रपटाद्वारे निर्मितीत उतरली व बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरली. उमेश विनायक कुलकर्णी दिग्दर्शित पहिला चित्रपट. 

चित्रपटाशी निगडित सगळी तंत्रे शिकवणारा अभ्यासक्रम आसलेली एक प्रशिक्षण संस्था आपण सुरू करावी, हे सुभाष घई यांचे स्वप्न होते. व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल या संस्थेच्या रूपाने ते प्रत्यक्षात आणले.
.................


जे. ओमप्रकाश
२४ जानेवारी १९२७ रोजी सियालकोट (पंजाब) येथे जे. ओमप्रकाश यांचा जन्म झाला. १९७४मध्ये ‘आप की कसम’ हा जे ओमप्रकाश यांनी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा. आखिर क्यूँ आणि आप की कसम हे त्यांचे गाजलेले सिनेमे. अफसाना दिलवालों का, आदमी खिलौना है, आदमी और अफसाना, भगवान दादा, अपर्ण, आस पास, आशा असे अनेक चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. त्याआधी निर्माते अशी त्यांची ओळख होती. १९६१ साली ‘आस का पंछी’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली. १९७५मध्ये प्रदर्शित झालेला आणि तुफान गाजलेला ‘आँधी’ हा चित्रपटही त्यांनीच प्रोड्यूस केला. आप की कसम, भगवान दादा, आदमी खिलौना है, अपनापन,, गेट वे ऑफ इंडिया अशा अनेक चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. जे ओमप्रकाश हे राकेश रोशन यांचे सासरे, हृतिक रोशन याचे आजोबा. हृतिकची आई पिंकी रोशन यांचे ते वडील. सात ऑगस्ट २०१९ रोजी त्यांचे निधन झाले.

माहिती संकलन : संजीव वेलणकर



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZLUCI
Similar Posts
अब्दुल हलीम जाफर खान, पं. उल्हास बापट, सर आयझॅक पिटमॅन ज्येष्ठ सतारवादक अब्दुल हलीम जाफर खान, ख्यातनाम संतूरवादक पं. उल्हास बापट आणि लघुलिपीचे (शॉर्टहँड) जनक सर आयझॅक पिटमॅन यांचा चार जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...
डॉ. सतीश धवन, अरविंद देशपांडे, जॉय अॅडम्सन नामवंत अंतराळशास्त्रज्ञ डॉ. सतीश धवन, ख्यातनाम अभिनेते अरविंद देशपांडे आणि वन्यजीवनाबद्दल लेखन करणाऱ्या लेखिका जॉय अॅडम्सन यांचा तीन जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...
प्रा. मधू दंडवते, शांताराम आठवले समाजवादी नेते, अर्थतज्ज्ञ व समाजसेवक प्रा. मधू दंडवते आणि नामवंत साहित्यिक व गीतकार शांताराम आठवले यांचा २१ जानेवारी हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
प्रसाद ओक, पॅरिस हिल्टन प्रसिद्ध मराठी अभिनेता प्रसाद ओक आणि जगप्रसिद्ध फॅशन डिझायनर, डीजे व उद्योजिका पॅरिस हिल्टन यांचा १७ फेब्रुवारी हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language